कोकणवासियांचा सर्वाधार |
महिमा जयाचा अपरंपार ||
श्री देव दयाळु कुणकेश्वर |
मायबाप माझा ||१||

अनाथांचा नाथ त्रैलोक्यनाथ |
नवनाथांचा नाथ आदिनाथ ||
श्री देव कुणकेश्वर जगन्नाथ |
मायबाप माझा ||२||

शिवभक्तांना आहे अति प्रिय |
करी कोटिकल्मषांचा लय ||
श्री देव कुणकेश्वर वर्णू काय |
मायबाप माझा ||३||

 
 
 
 
 
 
 
   
     
 

बारा ज्योतिर्लिंगे

सौराष्ट्रात (गुजरात) सोमनाथ, श्री शैलावर (आंध्रप्रदेश) मल्लिकार्जुन, उज्जयनीत (मध्यप्रदेश) महाकाल, ओंकारात (मध्यप्रदेश) अमरेश्वर, हिमालयात केदार, जकिनीत (पुणे) भीमाशंकर, काशीत (उत्तर प्रदेश)  विश्वनाथ, गौतमी तटावर (नाशिक) त्र्यंबकेश्वर, चिताभूमीत (बंगाल/महाराष्ट्र) वैद्यनाथ, दारूकवनात (परभणी, अलमेड, उत्तर प्रदेश) नागेश्वर, सेतु बंधावर (तामिळनाडू) रामेश्वर, शिवालयात (वेरूळ-महाराष्ट्र) घुमेश्वर) अशी बारा शिवांची बारा ज्योतिर्लिंगे आहेत.

श्री शिवाची उपासना करणारे लोक शैवपंथी होत. शैव उपासना ही अत्यंत प्राचीन उपासना आहे. विष्णूची भक्ती करणारे वैष्णव आणि शिवाची भक्ती करणारे शैव यांच्यात कालौघात 'हरि हर भेद' निर्माण झाला. अर्थात या वादात काही अर्थ नाही. कारण हरी म्हणजे विष्णू व हर म्हणजे शिव हे दोन शब्द एकाच 'ह' धातुपासून तयार झालेले आहेत. 'इ' प्रत्ययाने हरि व 'अ' प्रत्ययाने हर शब्दाची निर्मिती झाली. या दोन्ही शब्दांची मूळ प्रकृती एकच (ह) आहे. या दोघांत प्रत्यय भेद असूनही भेद उत्पन्न होऊ शकणार नाही. ' सर्वांणि पापानि दु:खानि वा हरतीति:' अथवा 'हरः.' भजन करणार्‍या आपल्या भक्तांची सर्व पापे तथा दु:ख हरण करतो तो हरि म्हणजे श्री विष्णू किंवा हर म्हणजे श्री शिव होय. व्युत्पत्तीशास्त्रानुसारही या दोन शब्दांत अभेदच आहे. अद्वैत हा भारतीय संस्कृतीचा आत्मा आहे. विश्वाच्या उत्पत्ती, स्थिती आणि लयाच्या व्यवस्थेसाठी ईश्वभक्ती ब्रम्हा, विष्णू व महेश अशा स्वरूपात अवतीर्ण झाली.

श्रीदेव महादेव हा द्रविडांचा देव मानला जातो. वेदात आर्यांनी द्रविडांच्या लिंगोपासनेची निंदाच केलेली आहे. द्रविड लोक शेतकरी. म्हणूनच त्यांनी आपल्या देवासमोर पुष्ट नंदीला कायमचे बसविले. 'महादेवाच्या आधी नंदीची पुजा' या म्हणीतही शिवाच्या वाहनाची महती दिसून येते. महादेवाच्या दर्शनापूर्वी नंदीचे दर्शन घेण्याची प्रथा आजही प्रचलित आहे.

श्री देवाधिदेव महादेवाची नावेच त्याचे कार्य स्पष्ट करतात. महादेव म्हणजे. सर्वात मोठा देव. ऍहिक व पारमार्थिक विपुल वैभव देणार महादेवासारखा दुसरा देव नाही. 'शिव' चा अर्थ होतो कल्याण. शिव म्हणजे पवित्र व सुंदर. सर्वांचे कल्याण करणे हेच महादेवाचे प्रमुख कार्य आहे. स्वतः कल्याणमय बना आणि सर्वांचे कल्याण करा हीच शिवनामाची शिकवण आहे. शंकर म्हणजे सर्वांचे शुभ करणारा. समुद्र मंथनाच्या वेळी जगाच्या कल्याणासाठी महादेव स्वतः हलाहल विष प्याला. राम नामाने त्याच्या विषाचा दाह शमला. थोडे विष कंठात शेष राहिले म्हणून महादेवाला नीलकंठ असे म्हणतात. श्री महादेव रामभक्त. राम ज्याचा ईश्वर तो रामेश्वर.

श्रीदेवाधिदेव महादेव वैराग्यशाली देव आहे. स्मशानात राहणे त्याला खुप आवडते. शिव महिम्नस्तोत्रांत महादेवाचे या संदर्भात फार सुरेख वर्णन केले आहे.

स्मशानात राहणारा, चिताभस्म धारण करणारा, नरांच्या मुंडक्यांची नरोटी हाती घेतलेला अमंगल वाटणारा तरीही स्मरणकर्त्या सर्व भक्तांचे नेहमीच मंगल करणारा असा हा महादेव आहे.

श्रीदेवाधिदेव महादेव 'प' वर्गाने वर्णन करता येईल. प म्हणजे पार्वतीश. फ म्हणजे म्हणजे फणिद्र. ब म्हणजे बालेन्दूधारक. भ म्हणजे भस्मधारक. म म्हणजे महादेव. भगिरथाने आणलेली गंगा महादेवाने मस्तकावर धारण केली नसती तर ती पुन्हा गुप्त होणारी होती. महादेवाने ती मस्तकावर धारण केली. त्यामुळे महादेव गंगाधर बनला. देवांची अडलेली सर्व कामे आमच्या एकटया महादेवाने आनंदाने पार पाडली आहेत. त्रिपुरासूर वध, दारूका-दारूक वध असे कित्येक दैत्यवध महादेवाने केलेले आहेत. त्यामुळेच त्याला त्रिपुरांतक, स्मरहर अशी नावे पडलेली आहेत. नीलकंठ, चंद्रशेखर, गंगाधार, त्रिलोचन ही महादेवाची रूपदर्शक नाववाचक आहेत. पशुपती, उमापती, भूतेश, रूद्राधिप ही त्याची आप्त परिवारवाचक नावे आहे.

महादेवाचा परिवारही फार मोठा आहे. भक्तजनांत तो अतिशय प्रिय आहे. भारतातीलच नव्हे तर जगातील शक्तिपंथ हा महादेवाची सहधर्मचारिणी पार्वतीच्या नावाने चालतो. देवांचाही देव असलेला गणपती महादेवाचा सुपुत्र महादेवाच्या नि:श्वासातून निर्माण झालेला काळभैरव जगाचा रक्षणकर्ता आहे.

श्रीमहादेवाधिदेव महादेव ही रूद्र देवता आहे. ती वेदप्रतिपाद्य आहे. श्रीमत् भगवद् गीतेत  श्री भगवान गोपालकृष्णांनी विभूती योगात आपण 'रूद्राणां शंकरश्चास्मि' असल्याचे सांगितले आहे. महादेव नाथपंथियात आदिनाथ आहे. नवनाथ परंपरेत आदिनाथ सोङहं बोधाचा प्रवर्तक आहे. 'आदिनाथ सिद्ध आदिगुरू थोर, त्यासी नमस्कार भक्तीभावे' अशा शब्दांत थोर नाथपंथी सद्‍गुरु श्रीक्षेत्र पावसचे परमहंस स्वामी स्वरूपानंद यांनी श्रीदेव महादेवाला मोठया कृतज्ञतेने विनम्र अभिवादन केले आहे.

 श्रीदेवाधिदेव महादेव हे छ्त्रपती शिवाजी महाराजांचे कुलदैवत आहे. शिंगणापूरच्या शंभू महादेवाच्या ठिकाणी छत्रपतींची अनन्यनिष्ठा होती. शिवशाहीतील रणमर्दानी 'हर हर महादेव' ही अत्यंत स्फूर्तिदायी रणगर्जना सुप्रसिद्ध आहे. राजस्थानी लोकही 'एकलिंगजी' चे म्हणजे महादेवाचे भक्त होते. 'जय एकलिंगजी'  ही त्यांची रणगर्जना आजही आपल्याला आठवते. रायरेश्वरी महादेवाच्या पिंडीवर रक्ताचा टिळा लावून बालशिवाजीने पिंडीवर रक्ताचा टिळा लावून बालाशिवाजीने स्वराज्याची स्थापना शपथ घेतल्याचा ऍतिहासिक प्रसंग आपल्या नजरेसमोर आहेच. शिवाजी महाराजांच्या रायगडावरील 'जगदिश्वर' व पुरंदरगडावरील 'केदारेश्वर' जगप्रसिद्ध आहेत.

शिवपुराणांतर्गत शिवपुजा रहस्य

श्रवण, किर्तन, मनन या तीन साधनांच्या अनुष्ठानास जे समर्थ नाहीत त्यांनी भगवान शिवाचे एक लिंग स्थापन करावे. त्याची नित्य पूजा करून हा संसार सागर तरून जावा. दुसर्‍याची वंचना, द्वेष, तिरस्कार न करता आपल्या शक्तीस अनुसरून जे धन प्राप्त होईल ते शिव लिंगास वा शिवमूर्तीस अर्पण करावे. वस्त्र, गंध, पुष्प, दीप, धुप, पुजा, इत्यादींची आराधना करून भक्ष्य व भोज्य अन्नाचा नैवेद्य दाखवावा. छ्त्र, ध्वज, व्यजन, चामर इत्यादी राजोपचारांनी शिवांच्या मूर्तीची पूजा करावी. प्रदक्षिणा, नमस्कार व यथाशक्ती जप करून आवाहनापासून विसर्जनापर्यंत सर्व कार्य भक्तीभावाने करावे.

लिंग स्वरूप  शिव

भगवान शिवांची पुजा सर्वत्र लिंग स्वरूपात होते.  कारण भगवान शिव ब्रम्हरूप असल्याने निष्फल (निराकार) आहेत. कालांतराने 'साकार' झाल्याने त्यांना 'सकल' ही म्हटले आहे. ते सकल आणि निष्फल असे दोन्ही रूपात स्थित आहेत. निष्फल-निराकार रूपामुळे शिवाच्या पूजेसाठी आधारभूत अशा लिंगाची निवड झाली. लिंग हे शिवाचे निराकार (पूर्वकालीन) स्वरूप आहे. दोन्ही रूपात त्यांची पुजा करता येते. केवळ भगवान शिवांचीच पूजा लिंग रूपात केली जाते. पुराणमते आणि पूर्वसुरींच्या मते हा सर्वच विषय अत्यंत गोपनीय आहे. लिंग हे साक्षात ब्रम्हाचे प्रतिक आहे.

महाशिवरात्रीचे शिवपूजन

एकदा ब्रम्हदेव व  विष्णूंनी महादेवांना आसनावर बसवून त्याचे पुरूष वस्तूंनी पुजन केले. ( दीर्घकालपर्यंत अविकृत भावाने राहणारी वस्तू पुरूष म्हणून ओळखली जाते. अल्पकाळ टिकणारी वस्तू प्राकृत वस्तू मानली जाते.)

ब्रम्हदेव व श्रीविष्णूंनी पूजन केल्यावर भगवान शिव प्रसन्न होऊन म्हणाले, 'आजचा दिवस महान आहे. आपण भक्तीभावानं माझं पूजन केलं आहे. मी तुमच्यावर प्रसन्न आहे. आजची ही तिथी शिवरात्री या नावानं विख्यात होईल. या दिवशी माझं लिंग रूप किंवा मूर्ती याची पूजा केल्यानं महापुण्य प्राप्त होईल. प्रथम मी जेव्हा ज्योतिर्मय स्तंभरूपात प्रकट झालो. तेव्हा मार्गशीर्ष महिन्याची आर्द्रा नक्षत्रयुक्त प्रतिपदा होती. या दिवशी माझी लिंग रूपात पूजा करणारा मला कार्तिकेयापेक्षा प्रिय होतो. माझी दोन रूपे आहेत. एक 'सकल'  व दुसरं 'निष्कल'. ब्रम्हभाव माझं निष्कल रूप असून महेश्वरभाव माझं सकल रूप आहे. दोन्ही माझी सिद्ध रूपं आहेत. ब्रम्हरूप असल्याने मी ईश्वरही आहे. जीवांवर अनुग्रह करणं माझं काम आहे. सर्वात बृहत् जगताची वृद्धी करणारा मी ब्रम्हपदांन ओळखला जातो, सर्वत्र समरूपात स्थित व व्यापक असल्यानं मी सर्वांचा आत्मा आहे. मीच सर्वांचा ईश्वर आहे. माझ्यात जे ईशत्व आहे ते माझं सकल रूप व निष्कल रूप माझ्या ब्रम्हरूपाचा बोध करणारे आहे. माझं लिंग रूप म्हणजे चिन्ह आहे. माझं हे स्वरूप माझ्या सामिप्याची प्राप्ती करून देणारं आहे. शिवलिंग नसेल व सर्वच मूर्तीच असतील तर ते स्थान क्षेत्र म्हणून ओळखले जाणार नाही.

शिवलिंगाचे वैज्ञानिक स्वरूप

संपूर्ण चराचर जग बिंदुनाथ स्वरूप आहे. बिंदु शक्ती व नाद शिव आहे. अशारीतीने संपूर्ण जग शिवशक्ती रूप आहे. नाद बिंदुचा व बिंदु जगताचा आधार आहे. बिंदु व नाद यांनी युक्त शिवस्वरूप जगताचे कारण आहे. बिंदु व नाद यांचे संयुक्त रूप म्हणजे शिवलिंग. बिंदुरूपी देवी उमा माता आहे. नाद स्वरूप भगवान शिव पिता आहे. माता-पित्यांचे पूजन करून परमानंदाची प्राप्ती होते. त्यांची पूजा करणार्‍या पुत्रावर त्यांची कृपा नित्य वाढत जाते.

भगवान शिवांचा नैवेद्य ग्रहण करावा की करू नये

भगवान शिवाला अर्पण केलेला नैवेद्य ग्रहण करू नये असे लोक सांगतात. त्याचे स्पष्टीकरण देताना शिव ही रूद्र म्हणजे क्रुर देवता आहे. तसेच ही वैराग्याची देवता असल्याने त्यामुळे वैराग्य येऊ शकते असे सांगीतले जाते. प्रस्तुतचा समज हा अर्धवट ज्ञानावर व पूर्वग्रहदूषीत मतामुळे झालेला आहे. शिवस्थानांत, मंदिरात ब्राम्हणांपेक्षा गुरव, जंगम यांना अधिक महत्व आहे. तसेच शिव ही आर्येतर देवता असल्याने लेखन क्षेत्रात प्राबल्य असलेल्या आर्यधार्जिण्यावर्गाने जाणीवपूर्वक भगवान शिवांबद्दल सदोष नोंदी करून ठेवल्या आहेत. प्रत्यक्ष शिवपुराणात याबाबत पुढीलप्रमाणे मत दर्शविले आहे.

जो भगवान शिवांचा भक्त आहे. आतून बाहेरून जो पवित्र व शुद्ध आहे, उत्तम व्रताचे पालन करणारा आहे, दृढनिश्चयाचा आहे त्याने शिवांचा नैवेद्य अवश्य भक्षण करावा. भगवान शिवांचा नैवेद्य अग्राह्य आहे या भावनेस मनातून काढून टाकावे. शिवांचा नैवेद्य महाप्रसाद म्हणून ग्रहण करावा. मात्र काही विशिष्ट हेतुने शिवाल अर्पण केलेल्या वस्तू आपण स्वतःस घ्यावयाच्या नसतात. त्या तेथील पूजार्‍याने घेण्यास काहीच हरकत नाही. इतर कोणत्याही देवतेच्या पुजार्‍यापेक्षा शिवाच्या पुजार्‍यास (सेवकास) नीति-नियमांचे, पावित्र्याचे नियम काटेकोरपणे पाळवे लागतात. अन्यथा त्याचे अपरिमित नुकसान होऊ शकते.

शिवपिंडीची (शिवलिंगाची पुजा)

शिवाच्या पिंडीवर फक्त थंड पाणी घालतात व बेल सफेद फुल वाहतात. पिंडीवर दूध व पंचामृत घालत नाहीत. तसेच हळद-कुंकू, अक्षताही वाहायच्या नसतात. पिंडीवर दर्शनी बाजुला भस्माचे तीन आडवे पट्टे ओढतात. त्याला त्रिपुंड्री असेही म्हणतात. काही वेळा भस्माचे तीन पट्टे काढून मध्ये एक वर्तुळ काढतात. त्याला शिवाक्ष म्हणतात.

पिंडीवर वाहायचा बेल तीन पानांचाच असायला हवा. त्रिदल बेल ह त्रिगुणात्मक शिवाचेच प्रतिरूप आहे. उत्पती, स्थिती, आणि लय या तीन क्रिया व सत्व, रज, तम या तीन गुणांचे एकरूप या त्रिदल बेलात एकवटलेले आहे. बिल्वपत्र पिंडीवर उपडे ठेवून देठ आपल्याकडे राहिल असा ठेवावा. आयुर्वेदात बेल फळाला अमृत म्हणतात. सर्व प्रकारच्या रोगावर बेल फळाचा उपयोग होतो. कोणत्याही औषधामध्ये पुरक म्हणून याचा उपयोग करत येतो. तसेच कोणतेही औषध उपलब्ध न झाल्यास याचा वापर करतात. फक्त गरोदर स्रीस बेल/बेलफळ वर्ज्य आहे.

शिवपूजेत शंखाची पूजा केली जात नाही. तसेच शिवास शंखातील पाणी घालत नाहीत. शिवाला तुळशीपत्र वहात नाहीत. शिवपिंडीला प्रदक्षणा घालावयाची असेल तर ही प्रदक्षणा 'सोमसूत्री' असाची. म्हणजेच डावीकडून उजवीकडे.

अभिषेक/ एकादशनी/लघुरूद्र

शिवाला अभिषेक प्रिय असतो. अभिषेकाने लिंग सातत्याने ओले ठेवल्यास 'देवत्व' वाढत जाते. शिवाला रूद्र (विशिष्ट मंत्र) म्हणत अभिषेक करतात. रूद्राध्याय अकरा वेळा (अकरा आवर्तने) म्हटले म्हणजे एक एकादशी होते. अकरा एकदशी म्हणजे लघुरूद्र होतो. अकरा लघुरूद्र म्हणजे एक महारूद्र होते. आणि अकरा महारूद्र म्हणजे अतिरूद्र होतो.

नमः शिवायचा अर्थ पुढीलप्रमाणे सांगीतला जातो.

न   =  समस्त लोकांचा आदिदेव.

मः =  परमज्ञान देणारा व महापातकांचा नाश करणारा.

शि =  कल्याणकारी, शांत व शिवानुग्राहाला कारणीभूत.

वा =  वृषभ वाहन, वासुकी व वामांगी शक्ती यांचा सुचक.

य =  परमानंद रूप व शिवाचे शुभ असे वास्तव स्थान.                             (शिवपुराणाच्या आधारे)