|
|
|
|
श्री क्षेत्र कुणकेश्वर.... कोकणातील एक पवित्र तिर्थक्षेत्र...अतीप्राचीन काळापासुन येथील कणकेच्या राईमध्ये वास्तव्य करुन असलेल्या शंभुमहादेवाची ही भुमी... कणकेच्या बनात असलेला ईश्वर म्हणजेच कुणकेश्वर... देवावरुन गावाचे नाव सुद्धा कुणकेश्वर असेच प्रचलीत झाले. सुमारे ११०० व्या शतकापासुन प्रसिद्धीला आलेले हे स्थान म्हणजे कोकणातील धार्मीक व ऐतिहासीक सौंदर्याचा मुकुटमणीच म्हणावा लागेल. कुणकेश्वर मंदिरा इतके प्राचीन भव्य देवालय कोकणात इतरत्र कुठेच नाही. पुणे, मुंबई, कोल्हापुर या शहरांशी देवगडहुन अवघ्या १८ कि.मी. अंतरावर कुणकेश्वर हे गाव आहे.एसटी थांबते तेथून अवघ्या ५-७ मिनिटांच्या अंतरावर असणार्या मंदिराचा कळस लक्ष वेधून घेतो.ऐन किनार्याशी असणार्या उंचवटयावर उभारलेल्या या मंदिरचा सागरतटाकडील भाग भक्कम बांधीव तटाने सुरक्षित राखला आहे. ८-९ मीटर उंचीच्या या तटावर असणार्या सपाट जागेवर मंदिर आहे. मंदिराचा परिसर २२-२४ मीटर उंचीच मंदिर आहे. मंदिराचा परिसर तटाने परिवेष्टित तर आहेच, पण खाली जांभ्या दगडांची फरशीही आहे. अशा या कुणकेश्वर मंदीराचा इतिहास सुद्धा तितकाच प्राचीन, रोमांचकारी आणि रहस्यमय असा आहे. |
|
|
|
|
|
या मंदिरासंबधी दोन दंतकथा सांगीतल्या जातात. |
|
|
|
|
|
१) एका गरीब ब्राम्हणाची गाय दुध कमी देउ लागली. तेव्हा त्याने तिच्यावर लक्ष ठेवले. कुणकेश्वर येथील शंभु महादेवाची पिंडी स्वयंभु असून पूर्वी ती कनक वृक्षांच्या घनदाट अरण्याने वेढलेली होती. ब्राम्हणाची गाय आपल्या मालकाला दूध न देता एका विवक्षित जागी जाउन ती गाय पान्हा सोडत असल्याचे त्याच्या लक्षात आले. त्याने त्या गाईला बेदम जोराचा फटका मारण्याचा प्रयत्न केला.पण गाय निसटून पळाली व त्या प्रहाराचा पाषाणावर आघात झाला आणि त्यातून भ़ळाभ़ळा रक्त येउ लागले. ते पाहून आश्चर्याने भयचकीत झालेल्या ब्राम्हणाची त्या पाषाणावर श्रद्धा बसली. हे स्वयंभू शिवलिंग असल्याची खात्री झाली. त्यानंतर तो ब्राम्हण त्या पाषाणाला शरण गेला व तेव्हापासून तो नित्यनियमाने या पाषाणाची पूजाअर्चा व दिवाबत्ती करू लागला आजही या शिवलिंगावर या घावाची खुण दाखविली जाते. |
|
|
|
|
|
२) एक इराणी व्यापारी समुद्रातील वादळात सापडला. आगतिक बनलेला व्यापारी परमेश्वराची करूणा भाकू लागला. तेवढयात त्याला पूर्वेकडे शांतपणे तेवणार्या दिव्याचा प्रकाश दिसला. दिलासा देणार्या त्या नंदादीपाला तो शरण गेला आणि या ठिकाणी मी खूप पैसा खर्चुन जीर्णोद्धार करीन असं त्यानं मनोमन ठरवलं. किनार्यावर सुरक्षित उतरल्यावर तो धावत तिथे गेला. हिंदूंच हे छोटं मंदिर होतं या शिवायलायाचा त्याने जीर्णोद्धार केला. तीन वर्षे आणि द्रव्य खर्चून त्यानं हे काम पुरं केलं देवाच्याच पायाशी जागा मिळावी म्हणून त्यानं शिखरावर चढून खाली उडी मारली व प्राणत्याग केला. त्याचं स्मारक कुणकेश्वराच्या उत्तरेस आहे.
हिच दंतकथा कुणकेश्वरचा इतिहास म्हणून अलिकडच्या काळापर्यत सांगितली जात होती. परंतु जसजशी कुणकेश्वरची प्रसिद्धी वाढत गेली तशी अभ्यासकांची दृष्टी येथे पडली. प्राचीन काळी जेव्हा मुसलमानी सत्ता हिंदुंना मुळासकट उचकटण्याचा प्रयत्न करित होत्या त्या काळी एक मुस्लीम व्यक्तीकडुन हिंदु मंदिर कसे काय उभारण्यात आले. त्यामुळे हि दंतकथा अभ्यासकांना खटकण्यासारखीच होती. त्यामुळे कुणकेश्वरच्या इतिहासाचा अधिक चौकसपणे अभ्यास होऊ लागला.
१९६० च्या सुमारास शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी कुणकेश्वर मंदिरास भेट दिली. त्यावेळी बाबासाहेबांनी मंदिर परिसराची चिकीत्सक दृष्टीने पाहणी केली. आणि थडगे म्हणून दाखवली जाणारी इमारत हि, हिंदु मंदिराची असुन आतील थडगे समजला जाणारा मातीचा ढिगारा बनावट असल्याचे साधार पुराव्यानिशी दाखवून दिले. अशाप्रकारे बाबासाहेब पुरंदरे यांनी कुणकेश्वर मंदिराच्या इतिहासातील सत्य परिस्थिती सर्वांसमोर आणली. त्यानंतर कोंकणातील गावह्राटी पुस्तकाचे लेखक श्याम धुरी तसेच साप्ताहिक अणुरेणूचे माजी संपादक रणजित हिर्लेकर या अभ्यासकांनी ही याविषयी संशोधन केले असुन, "कुणकेश्वर मंदिर हे अरबी व्यापार्याने बांधले नसुन हे मंदिर कदंब, चालुक्य, राष्ट्रकूट, यादव यांसारख्या हिंदू साम्राज्य काळातील आहे. आणि थडगे समजले जाणारी वास्तू हि एक बाटवलेले शिवमंदिर आहे." असा निष्कर्श सर्वांनी मांडला आहे. अरब व्यापार्याची कथा हि वारंवार आक्रमण करणार्या मुसलमानी सरदारांच्या डोळयात धूळ फेकण्यासाठीच केलेली एक व्यूहरचना होती. मंदिराच्या रक्षणासाठीच मुस्लिम व्यापाराने हे मंदिर बांधल्याचे कथानक मुद्दामच पसरविण्यात आले. पण तीच दंतकथा होऊन आपल्या पुढे उभी आहे. पनवेलजवळच्या कणकेश्वर मंदिराच्या बांधकामाविषयी देखील कुणकेश्वर मंदिरासारखीच अरबी व्यापार्याची कथा सांगीतली जाते. तसेच राजापुरच्या अंजनेश्वर मंदिराच्या बांधकामाविषयी देखील हिच कथा सांगितली जाते. अनेक ठिकाणी मंदिरांच्या रक्षणासाठी अशी थडगी उभारली गेली आहेत. रामेश्वर मंदिराच्या सभामंडपालगत दिपमाळेच्या रांगेत असेच एके बनावट थडगे आहे. ही सर्व सुलतानी तडाख्यातून मंदिरे वाचविण्यासाठी केलेली एक व्यूहरचना होती.
|
|
|
कथा कुणकेश्वर मंदिराच्या विध्वंसाची व जिर्णोद्धाराची
या मंदिराच्या जिर्णोद्धाराचे काम वेळोवेळी हिंदू राजांच्या काळात झालेले आहे. पण जुन्या कागदपत्रांच्या सहाय्याने निश्चित होणारा मंदिराचा जिर्णोद्धार हा शिवकाळातील आहे.
छत्रपती शिवरायांच्या काळात सुलतानी आक्रमणांचा उपद्रव पोचलेल्या असंख्य मंदिरांचा जिर्णोद्धार झालेला आहे. सुलतानी आक्रमणाने पिचलेल्या भारतात शिवरायांच्या पराक्रमाने पुन्हा एक परिवर्तनाची लाट आली. आणि मग आपल्या परमप्रिय दैवतांची पुनर्स्थापना करण्याची ओढ या मातीतील माणसाला होऊ लागली. कुणकेश्वर मंदिराचा झालेला जिर्णोद्धारही याच काळातील आहे. हा काळ शिवराज्याभिषेकानंतरचा. आजपासून जवळजवळ ३00 वर्षाँपूर्वीचा. शिवाजी महाराज हे प्रत्यक्ष कुणकेश्वर मंदिरातही येऊन गेल्याचे सांगितले जाते. कुणकेश्वर मंदिर हे काहीसे एका बाजुला असल्यामुळे व अतिशय दुर्गम असणार्या या भूप्रदेशामुळे सुलतानी आक्रमकांच्या आसुरी तांडवापासून काहीसे सुरक्षित राहीले. तरी शिवाजी महाराजांच्या मृत्युनंतर व औरंगजेब दक्षिणेत उतरल्यानंतर या मंदिराला उपसर्ग पोहोचला होता असे इतिहास सांगतो.
त्याकाळी छत्रपती शिवरायांच्या अष्टप्रधान मंडळापैकी एक असणार्या नारो निळकंठ अमात्य यांच्या अधिपत्याखाली हा विजयदुर्गपासूनचा सागरी प्रदेश होता. नारो निळकंठांची कुणकेश्वरावर अपार श्रद्धा होती. औरंगजेबाचा पुत्र शहाआलम हा घाट उतरुन या तळकोकणात आल्यामुळे आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली होती. त्यावेळी कुणकेश्वर मंदिर हे एक डोळ्यांत भरणारे मोठे तिर्थक्षेत्र होते. त्यामुळे कुणकेश्वर मंदिराला शहाआलम त्रास देईल अशी भिती नारो निळकंठांना वाटू लागली. त्यावेळी नारो पंडितांनी कुणकेश्वर परिसरातील ग्रामस्थांना विश्वासात घेऊन मंदिराच्या संरक्षणासाठी नक्कीच काहीतरी योजना केली असणार. त्यांनी जी उपाययोजना केली तीच ही अरबी व्यापाय्राची दंतकथा होय.! असे मत श्री शाम धुरी यांनी मांडले आहे.
नारो निळकंठ यांचे समाधी स्थान
नारोपंतांनी आपल्या आराध्य दैवताच्या रक्षणासाठी उपाययोजना सुरु केली.मंदिराच्या परिसरात प्रवेश करताच पहिल्याच दृष्टीक्षेपात दिसणार्या छोटया मंदिरातील मूर्ती हलवून तेथे मातीने लिंपून थडग्याच्या आकाराचा आभास निर्माण केला. या मंदिराच्या कळसाचे कोरीव बांधकाम तासून काढून व डागडुजी करुन त्याचा आकार घुमटासारखा केला. नंतर त्यांनी कुणकेश्वर मंदिर अरबी व्यापार्याने बांधल्याची हूल उठवली. त्याचबरोबर आपल्या तटपुंज्या लढावू माणसांना सोबत घेऊन नारो निळकंठ अमात्य हे मंदिर परिसरात तळ देऊन बसले. परंतु तरिही शहाआलमची नजर कुणकेश्वर मंदिरावर पडली. त्याने कुणकेश्वर मंदिरावर जोरदार हल्ला चढविला. मंदिराभोवतीच्या तटबंदीच्या आधारे आपल्या तोकडया बळानिशी मराठयांनी कडवा प्रतिकार केला. पण शहा आलमचा तडाखा भारी पडला. मराठयांची हार होत असलेली पाहून मंदिराच्या कळसातील गुप्त जागेत तळ देऊन बसलेल्या नारोपंतांनी अखेरीस स्वतः तलवार उपसली व मंदिराच्या शिखरावरुन हरहर महादेव अशी रणगर्जना करीत आक्रमकांच्या तोँडावरच उडी घेतली. या रोमांचकारी घटने मराठयांना चेव चढला. त्यांनी मोगल सैन्यावर जोरदार हल्ला चढविला. मराठयांचा तो रौद्रावतार पाहून मोगलांनी माघार घेतली. पण तोपर्यँत मंदिर परिसराचे बरेच नुकसान झालेले होते. झाल्या प्रकाराने नारोपंतांना जबर मानसिक धक्का बसला. या धक्यातून ते सावरले नाहीत. पुढे कुणकेश्वर येथेच त्यांचे निधन झाले. मंदिराच्या दक्षिण बाजुला जेथे त्यांनी उडी घेतली होती तेथेच त्यांचे समाधीचे तुळशी वृंदावन बांधण्यात आलेले आहे. कुणकेश्वरच्या पालखीच्या वेळी म्हटली जाणारी आरती ही अमात्य नारोपंतानीच लिहीलेली आहे. या आरतीतही नारोपंडितांच्या उडीचा स्पष्ट उल्लेख आहे.
|
|
|
११ जुलै १८५० मध्ये मेज ली ग्रँट जेकब या मुंबईच्या पॉलिटिक्ल सुपरिटेंडेटने मोठया परीश्रमाने एक ताम्रपट शोधला. नागदेवाचा ताम्रपट म्हणून हा विख्यात आहे. सन १४३६ या संस्कृत ताम्रपटात इंदूल (आताचे हिंदळे) गावच्या राजाने देवशर्मा या विद्वान ब्राम्हणाचा सन्मान केला. त्या पुण्यकर्मामुळे या राजाचे ऐश्वर्य तर वाढलेच, पण त्यास पुत्रप्राप्तीही झाली.या रहाळाचा स्वामी असणार्या कुणकेश्वराच्या प्रसादामुळेच हे सारे त्या ताम्रपटात नमूद केले आहे. कुणकेश्वर गाव पूर्वी या देवास इनाम होते. इंग्रजी अमदानीत ते रद्द होउन, वार्षिक रोख रक्कम सरकारकडून नेमण्यात आली आहे. |
|
|
|
|
|
|
|
|
सिंधुदुर्ग जिल्हयातील देवगड हे तालुक्याचे ठिकाण, येथील हापुस आंबे जगप्रसिध्द. भारतातील सर्वात मोठे सर्पविष प्रतिबंधक औषध तयार करणारे केंद्र म्हणून देवगडचं स्थान अनन्यसाधारण आहे. १ मे १९८६ पासून देवगड पवनचक्की हा वार्यापासून वीज निर्माण करण्याचा अभिनव प्रकल्प येथे सुरू झाला. ३० एकर जमिनीत उभारलेल्या १० पवनचक्यांपासून दर ताशी ५०० युनिट वीज तयार होत असते. तसेच देवगड मत्स्योद्योगही चांगलाच भरभराटीला येत आहे. |
|
|
|
|
|
देवस्थानच्या परिसरात समुद्रकिनारी काही शिवलिंग आहेत. त्यापैकी २१ शिवलिंग आपणास पाहावयास मिळतात. या शिवलिंगामागील इतिहास असा आहे की, गेली कित्येक वर्ष समुद्राच्या पाण्यामध्ये असणारी ही शिवलिंग झिज होत असतानासूद्धा ती पुर्ववत प्रमाणे आहेत अशी निदर्शनास येतात. इतका काळ लोटला तरी त्यांची म्हणावी तितकी झिज झालेली नाही. गेले कित्येक वर्षे यात्रेकरु या शिवलिंगाचे दर्शन घेत आहेत. ही शिवलिंग पांडवांनी घडवलेली आहेत अशी श्रद्धा आहे. याची साद देणारी पांडवलेणी आजही येथे आहेत. |
|
|
|
|
|
देवळापासुन जवळच पूर्व दिशेस डोंगराच्या उतरणीवर काही लोक जमीन खणत असताना पूर्वकाळापासून कित्येक शतके बुजालेले एका गुहेचे दार मोकळे होऊन आंत कोरीव पाषाणी मूर्ती आढळून आल्या ही गुहा म्हणजे इतर कोरीव लेण्यांप्रमाणे एक लेणी आहे. पण यातील मूर्ती मात्र गुहेच्या दगडांवर कोरलेल्या नसून त्या अलग आहेत. गुहेची खोली तांबडया कापाच्या दगडाची असून मूर्तीचा दगड काळा-काळित्री आहे. हा काळा दगड गावात समुद्राच्या कडेस आणि डोंगराच्या कडयांत क्वचित स्थळी सापडतो.या गुहेला सध्या पांडव लेणी म्हणून ओळखले जाते.
गुहेची खोली सुमारे १० फुट लांब ८ फुट रूंद आणि ६ फुट उंच असून, पाच फुट उंच आणि तीन फुट रूंद असा दरवाजा आहे. आत १८ कोरीव मुखवटे शिवलिंग आणि नंदी मिळून २० नग आहेत. मुखवटयांची मांडणी जोडी जोडीने केलेली आहे. पुरूष व स्त्री अशा ८ जोडया, एक तरूण पुरुषाचा मुखवट स्वतंत्र बसवलेला आहे. तसेच एक पुतळयाची नासधूस झाल्यामुळे तो पुरूषाचा किंवा स्त्रीचा हे नीट ओळ्खता येत नाही. त्यामुळे तो एका बाजुस ठेवला आहे. शिवलिंग आणि नंदी हे देखिल काळा- (काळित्री) दगडाचे असून गुहेत प्रवेश केल्यावर तिच्याध्यभागी पण जरा डाव्या बाजूस ठेविले आहेत.
गुहेतील मुर्त्या हया देवतांच्या मुर्ती नसून राजघराण्यातील स्त्री पुरूषांचे ते मुखवटे आहेत. त्यांचे कोरीव काम उच्च दर्जाचे दिसून येते. कौशल्यामध्ये ओबडधोबडपणा कमी असून रेखीव व सुबकपणाकडे कोरण्याकडे चांगलेच लक्ष दिले आहे. पुरूषांच्या आकृती जरा मोठया असून त्या मानाने स्त्रियांच्या लहान आहेत. प्रत्येक जोडप्यास निराळी बसकण आहे. प्रत्येक मुखवटयाला राजास आणि राजघराण्यातील स्त्रीपुरूषांस शोभेल असाच पेहराव केलेला आहे. प्रत्येक मुखवटयास शिरपेच, डोकिच्या एका बाजूस तुरा, मोत्यांचे पेड कोरीव कामांत दाखविले आहेत. तसेच महाराष्ट्रीय वळणाची शिरोभूषणे आपणास या मुर्त्यांवर पाहावयास मिळतात.या बाबतचे आणखी संशोधन चालू आहे. मुळात कोकणात लेणी थोडी आहेत. आणि अशा तर्हेचे लेणे तर नाहीच. |
|
|
|
|
|
देवालयाच्या दक्षिणेकडील किनारपट्टीच्या मधल्याभागी एक छोटीशी राई आहे. तिथेच एक पुरातन बांधणीचा तलाव आहे. त्याच्याबदद्ल अशी माहिती आहे की, हा तलाव बर्याच वर्षापूर्वी बांधलेला असावा. तो साफ बुजलेला होता. तलावाशेजारी मारूतीचे मंदिर आहे. त्या मंदिरात श्रीमान लब्दे महाराज तपश्चर्या करीत असताना त्यांना तलावाबद्दल दॄष्टांत घडला. ताबडतोब त्यांनी ग्रामस्थांच्या नजरेस ही घटणा आणली व ग्रामस्थांनी ही जागा खोदण्यास प्रारंभ केला असता माती खाली तलाव आढळून आला. समुद्रच्या अगदी जवळ असुनही या तलावाचे पाणी मचूळ नसून पिण्यायोग्य गोड आहे. ही आश्चर्याची बाब मानली जाते. हया तलावाशेजारीच लब्दे महाराजांची समाधी आहे. |
|
|
|
|
|
प्राचीन देवालय |
|
|
कुणकेश्वराचा राज्याभिषेक शके ५५ मध्ये शंभू छत्रपतीने (करवीरकर) कान्होजी आंग्रे यांस कुणकेश्वराच्या देवस्थानाच्या बाबतीत काही भानगडी असल्यास त्या दूर करून त्यावर लक्ष ठेवावा म्हणून हुकूम केला. वर दिलेल्या गॅझेटिअरमधील उतार्यात सन १६८० मध्ये कोल्हापूरच्या राजाने मंदिर दुरूस्त केल्याचा उल्लेख आहे.
श्री कुणकेश्वराच्या गाभार्याचे शिखर बरेच उंच असून ते बदामी आकाराचे बांधलेले आहे. कोकणात मिळणार्या जांभ्या दगडाचा उपयोग बांधणीसाठी केला असून बळकटीच्या ठिकाणी काळेभोर दगड घातले आहेत. देवस्थानचे क्षेत्रफळ सुमारे पाऊन एकर आहे. देवालयाचे चार प्रमुख वेगवेगळे विभाग आहेत
१) गाभारा २) मुंगसाळ ३) विश्रांती स्थळ ४) सभा मंडप.
कुणकेश्वर गावचे प्राचीनत्व दा़खविणारी कुणकेश्वराशिवाय आणखी पाच देवळे आहेत. तटाबाहेर उत्तरेच्या बाजूस छोटा पण टूमदार असा जुन्या बांधणीचा तलाव आहे. |
|
|
श्री क्षेत्र कुणकेश्वराची वैशिष्ट्ये |
|
|
श्री क्षेत्र कुणकेश्वर हा अलिकडे रुढ झालेला शब्द आहे. परंतू 'श्री क्षेत्र कुणकेश्वर' असाच याचा उल्लेख व्हायला हवा. कारण येथील दैवीशक्ती ही केवळ प्रधान शिवलिंगापुरती मर्यादित नसुन मंदिर आणि त्याच्या सभोवतालचा परिसर आणि त्याच्या सान्निध्यात असलेला समुद्र हे संपूर्ण क्षेत्रच दैवी शक्तिने युक्त आहे. पंढरपूरनंतर महाराष्ट्रातील हे एकमेव असे स्थान आहे की ज्याचा 'क्षेत्र' असा उल्लेख केला जातो. पंढरपूर आणि कुणकेश्वर या दोन स्थानात बरेच साम्य आहे.
श्री क्षेत्र कुणकेश्वर मंदिराकडे येणारे दोन रस्ते ( एक कणकवलीकडून येणारा तर दुसरा देवगडकडून येणारा ) गावातील शाळेसमोर एकत्र येतात इथे महापुरूषाचे स्थान आहे. |
|
|
|
|
|
श्रीदेव मंडलिकाच्या ( थोडे पुढे ) डावीकडे श्रीदेव नारायणाचे मंदिर आहे. नारायणाची ही मुर्ती अतिशय दुर्मीळ प्रकारातील आहे. या मुर्तीच्या प्रभावळीत दशावतार कोरलेले आहेत. नीट निरीक्षण केले तरच ते लक्षात येतात. नारायणाचे हे पाषाण खूपच मागे कललेले आहे. त्याला योग्य स्थितीत आणल्यास येथील दैवी शक्तीच्या स्पंदनात वाढ होईल. नारायण मंदिराच्या थोडे पुढे अलिकडच्या काळात बांधलेले श्री गणपती मंदिर आहे. या मंदिराच्या समोर पुढे एक उंच लाकडी खांब उभा केलेला आहे. त्याला ढालकाठी म्हणतात. याच्यामुळे वार्याची दिशा कळते. याच्या थोडे पुढे गेल्यावर मुख्य मंदिराच्या उजव्या बाजूला एक मोठे तुळशी वृंदावन आहे. हेच ते नारो नीळकंठाचे समाधीस्थान. इथेच नारो नीळकंठ यांनी मंदिराच्या कळसावरून उडी मारली होती. तिथून पुढे गेल्यावर समुद्रात उतरण्यासाठी पायवाट आहे. |
|
|
भैरव मंदिराच्या डाव्या बाजूला जे छोटे मंदिर आहे त्याला 'समाधी मंदिर' अशी दगडी पाटी लावलेली आहे. |
|
|
|
|
|
या मंदिर समुहातील कुणकेश्वराच्या मंदिरांच्या खालोखाल सर्वात मोठा असा हा चौथरा उपेक्षित स्थितीत आहे. त्याच्या डाव्या बाजूला जोगेश्वरीचे मंदिर आहे. हा पडका चौथरा हेच जोगेश्वरी देवीचे स्थान आहे.
श्री पावणाई देवीचे मंदिर श्री देव कुणकेश्वर मंदिराच्या पुर्व दिशेला दहा मिनिटच्य अंतरावर रस्त्याच्या शेजारीच आहे. पावणाई देवीचे मंदिर हे मंदिर नंतरच्या काळात (१८ व्या शतकात) बांधले गेले आहे. |
|
|
कुणकेश्वर मंदिराच्या मागील दगडी कठडयाच्या बाहेर एक छोटी घुमटी आहे. या घुमटीत कोणतीच मुर्ती अथवा दगड पुजेला ठेवलेला नाही. मात्र त्यात नेहमी फुले वाहून पुजा केली जाते. या घुमटीच्या मागे सर्वात उंच ठिकाणी अजून एक पडका चौथरा आहे. आजच्या क्षणी तो गवताने पुर्णपणे झाकला गेलेला असून त्याचे अस्तित्व अनेकांना माहित नाही. भैरव मंदिराच्या डाव्या कोपर्यात गोडया पाण्याची पुरातन विहीर आहे. जोगेश्वरी मंदिराच्या डाव्या बाजुला ( उत्तर दिशेला ) एका जुन्या घराच्या जागेवर एक सुसज्ज दोन मजली भक्तनिवास बांधण्यात आले आहे. या भक्तनिवासाच्या समोरच नुतनीकरण केलेला पाण्याचा तलाव आहे. भक्तनिवास आणि तलाव यांच्या मधोमध डाव्या बाजुला मंदिरातील दिवंगत नारायण गोविंद गुरव यांची समाधी आहे. |
|
|
|
|
|
कुणकेश्वर मंदिराच्या समोर उजव्या आणि डाव्या बाजुला दोन पाषाण आहेत. त्यांना चंड आणि मुंड असा संबोधले जाते. यापुर्वी प्रसिध्द झालेल्या माहितीतही त्याचा असा उल्लेख आहे. ज्या पध्दतीने त्यांचा उल्लेख केला जातो त्याअर्थी ते व्दारपाल असायला हवेत. तसे असते तर दोघांची बैठक समांतर असायला हवी. तसेच दोघांचे आकार आणि बैठकीची उंची यात समानता हवी आणि दोन्ही ठिकणी एकच विधी व्हायला हवेत. तसे ते होत नाहीत. उजवीकडील ( नारायण मंदिराच्या समोरील ) जो पाषाण आहे त्याला 'चंड' असे संबोधले जाते. |
|